महिला समाजसुधारक (भाषण)


       
           " महिला समाजसुधारक"


            प्रथमतःविद्येची देवता माता सावित्रीबाई यांच्या प्रतिमेस व माझ्या महिला गुरुजन वर्गास त्रिवार वंदन आणि माझ्या सर्व मैत्रिणीस नमस्कार.मी कु................आज जागतिक महिला दिनानिमित्त मी आपणांसी हितगुज करणार आहे.या शुभदिनी काय बोलावे ? हा एकच प्रश्न समोर उभा राहिला आणि माझ्या विचारप्रक्रियेला प्रारंभ झाला.त्या "महिला समाज सेविकांमधील पंचरत्नांचे कार्य" आपल्यासाठी अनमोल आहे ते विसरता येणार नाही. त्यामुळे मी त्या पंचरत्नाविषयी बोलण्याचे निश्चित केले आहे.  
 
" महिला समाजसेविकांमधील पंचरत्नांचे कार्य ."

१. सर्वप्रथम मी ,विद्येची देवता माता सावित्रीबाई यांच्या कार्याचा गौरव करते. महात्मा फुलेसावित्रीबाई फुले हे दांपत्य नसते तर आज समोर बसलेल्या महिला शिक्षिका व आपण विद्यार्थिनी शाळेतच आलो नसतो. आपणाला समाजव्यवस्थेत पुरुषांप्रमाणे समानताही मिळाली नसती. सावित्रीबाईंचा जन्म सातारा जिल्ह्यातील नायगाव या ठिकाणी झाला असला तरी त्यांचे कार्य भारतातील महिलांनाच नव्हे तर जगातील महिलांना प्रेरक आहे. सावित्रीबाई महाराष्ट्रातील स्त्री मुक्ती आंदोलनाच्या पहिल्या अग्रणी तसेच पहिल्या स्त्री शिक्षिकापहिल्या मुख्याध्यापिका आहेत. म्हणूनच त्यांचा जन्मदिन आपण "स्त्री मुक्ती दिन" म्हणून साजरा करतो. मुलींची पहिली शाळा त्यांनीच सुरू करून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. आपल्या पतीबरोबर भारतात शैक्षणिक कार्य करत असताना त्यांना अनेक प्रकारचा समाजाचा त्रास सहन करावा लागला. पतिनिधनानंतर ही महात्मा फुलेंचे सत्यशोधक समाजाचे कार्य त्यांनी पूर्ण केले. अशा या देवतेस माझे त्रिवार वंदन

२. सावित्रीबाईं प्रमाणे महिलांच्या उन्नती मध्ये "तर्खडकर भगिनींनी" सुद्धा योगदान दिले. डॉक्टर आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांच्या त्या तीन मुली - दुर्गा ,अन्नपूर्णा व माणिक. "अन्नपूर्णा "तर विलायतेला जाणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला होती. या तीनही बहिणीनी महाराष्ट्रातील महिलांच्या समानतेसाठी आपले योगदान दिले.

३. तिसरे महिलांसाठी कार्य करणारे रत्न आहे "पंडिता रमाबाई". पंडिता रमाबाईंनी महिलांसाठी कार्य करणारी संस्था "आर्य महिला समाजची" स्थापना रमाबाई रानडे व महादेव गोविंद रानडे यांच्या मदतीने केली. मुलींच्या शाळेत स्त्री शिक्षिका प्रमाणे इन्स्पेक्टर सुद्धा स्त्री असावी असे मत त्यांनी व्यक्त केले होते. स्त्रियांसाठी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी व्हाईसरॉय लॉर्ड डफरीनच्या पत्नी लेडी डफरीनच्या नावाने फंड जमा केला. स्त्रियांसाठी व विधवांसाठी "शारदा सदन", "मुक्ती सदन" यासारख्या संस्था स्थापन केल्या. पतित स्त्रियांसाठी "कृपा सदन" व अंध मुलींसाठी "बातमी सदन" तसेच अनाथ मुलींसाठी "सदानंद सदन" अशा संस्था स्थापन केल्या. त्यामुळेच आपण त्यांचा उल्लेख स्त्रीमुक्तीची आद्यप्रवर्तक असा करतो. त्यांच्याही स्मृतीस माझे त्रिवार वंदन.

४. चौथे महिलांसाठी कार्य करणारे रत्न म्हणजे डॉ.आनंदीबाई जोशी. अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रातील पदवी मिळवणारी भारत देशातील पहिली महिला होय. त्यांनी फिलाडेल्फिया येथे वुमेन्स मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तसेच पेनसिल्व्हानिया विद्यापीठातून त्या एमडी झाल्या. त्यांच्यामुळेच भारतामध्ये "स्त्री स्थित्यंतराची प्रक्रिया" घडून आली.

५. शेवटचे रत्न म्हणजे "रमाबाई रानडे". पंडिता रमाबाई नंतर प्रभावी कार्य करणारी महिला. आर्य महिला समाजाच्या स्थापनेतही त्यांचा सहभाग होता. स्त्री शिक्षणामध्ये त्यांचे योगदान मोलाचे आहेत. "सेवासदन" संस्थेच्या माध्यमातून स्त्री विकासासाठी शिक्षण ग्रंथालय व मोफत दवाखाना वर्गही सुरू केले होते. आजचे मुलींना प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत आहे ते त्यांनी १९१८ मध्ये सुरू केले होते अशा या सर्व महिला समाजसेविकाना पुन्हा एकदा त्रिवार वंदन.
                             
             जय हिंद जय भारत.