दिनूची कथा

दिनूला स्मशानातली ड्युटी लागली. कोरोनामुळे कोणच तयार होत नव्हते. नगरपालिका रोज आदेश देत होती. परंतु प्रत्येक कर्मचारी नकार देत होता. काहीजणांनी तर नोकरी सोडली. बघून देखून कुराडी वर पाय. कुणाचा जीव वर आलाय. कोरोना झालेल्या प्रेताला अग्नी द्यायचा म्हणजे मरणाच्या दाढेत स्वतःला ढकलायचं. त्यापेक्षा नोकरी सोडलेली बरी. 

पण दिनूने ड्युटी स्वीकारली. आनंदाने स्वीकारली. इलाज नव्हता ही गोष्ट खरीच. पण इलाज असता तरी त्याने स्वीकारली असती. दिनू होताच तसा. दिलेला शब्द आणि आदेश पाळणारा. कष्टाळू. नगरपालिकेत तीस वर्षे घालवली. कधी लेट मार्क नाही. कधी मेमो नाही. कधी कुठल्या साहेबांबरोबर तक्रार नाही. अधिकाऱ्यांबरोबर वाद नाही. कोरोनाच्या काळात एकही रजा नाही. सुट्टीदिवशी घरी असेल तेवढाच. 

नोकरीच्या जीवावरच चाळीस लाखाचं घर बांधलं. दोन एकर शेत घेतलं. मूलग्याला शिकवलं. एमएसस्सी केलं. मुलीला शिकवलं. बीडीएस केली.  मुलगा बायको सहित कोल्हापूरला आहे. मुलगी नवऱ्याबरोबर पुण्याला आहे. सून एमबीए आहे. दिनू आणि बायको गावी असतात. 

गेल्या महिन्यात दिनूची बायको पॉझिटिव आली. ताप येऊ लागला.  दवाखान्यात नंबर येत नव्हता. चार दिवस तसेच अंगावर काढले. मग दवाखान्यात नंबर आला. पण वेळ गेली होती. बायको मरण पावली. 

प्राथमिक आरोग्य केंद्रातील माणसे आली. प्रेत घेऊन गेली. त्यांच्याबरोबर दिनूही गेला. प्रेताला अग्नी देण्यात अडचणी आल्या. दोन दिवस प्रेताची हेळसांड झाली. दिनूला खूप राग आला. एकतर बायको गेल्याचे प्रचंड दुःख. त्यात शेवटी तिचा हा खेळ पाहून दिनू पिळवटून गेला. शेवटी दोन-तीन दिवसांनी बेवारस प्रेतासारखा दिनूच्या बायकोला अग्नि दिला गेला. 

कोरोनाच्या धास्तीने पोरगा आला नाही. सून आली नाही. मुलगी आली नाही. जावई आला नाही. तरी दिनूला काही वाटले नाही. पण त्यांचा फोन सुद्धा आला नाही. दिनूला त्याचे फार वाईट वाटले. कदाचित चार आठ दिवसांनी भेटायला येतील या आशेवर तो होता. पण तीही आशा फोल ठरली. महिना गेला तरी कुणी फिरकलं नाही. गाववाल्यांनी तर बहिष्कार टाकलेला. 

एकेदिवशी दिनूने पोराला फोन केला. 
"पोटाची आबाळ होत आहे. लाॅकडाऊनमुळे सुट्टीच आहे. गावी या रहायला. आई गेली तरी तुम्ही आला नाही. तिथे तरी काय करताय? इथे घरात एकत्र राहता येईल. माझी पण जेवणाची सोय होईल. पण पोरग्यानं ऐकलं नाही. 
म्हणाला, "मुलग्याचे ऑनलाईन क्लास असतात. शिवाय आईमुळे तुम्हीपण पॉझिटिव्ह असाल. शक्यता असते. तपासून घ्या. कशाला रिस्क घेताय आणि आम्हाला देताय.  नीतू पण यायला तयार नाही".
दिनू म्हणाला, "पोटाला काय खावू, बाळा? खानावळी बंद. हॉटेल बंद. घरी हाताने स्वयंपाक करता येत नाही. इलाज असता तर तुला येवूच नको म्हटलं असतं. पण इलाज नाही. म्हणून विचार कर. दोघेही आला तर बरे होईल". पण पोरानं ऐकलं नाही. 
"करा काहीतरी सोय", म्हणाला आणि फोन कट केला. 

पोटच्या पोराचं वागणं बघून दिनूला खूप वाईट वाटलं. तो मनातल्या मनात खचला. पोराचं फोनवरचं बोलणं ऐकून विझत चाललेल्या दिव्या सारखी आपली दुनिया संपू लागली आहे असं त्याला वाटू लागलं. दोन दिवस नुसत्या पाण्यावर काढले....

आणि तिसऱ्या दिवशी ही ऑर्डर हातात पडली. ड्युटी स्मशानात लागली. एक वेळचे जेवण नगरपालिका देणार होती.  बाकीची सोय ज्याची त्याची.  मग दिनूने नकार दिलाच नाही. एका वेळेच्या जेवणाकरिता ड्युटी करावीच लागेल. मनाची समजूत घातली. ड्युटी वर जॉईन झाला.

गावाच्या बाहेर स्मशान. स्मशान कसले? जळकटीच ती.  मोठा ओढा. लिंबाची काळवंडलेली झाडे.  धुराने सडलेले पत्रे. मोडकी बाके. पलीकडच्या कोपर्‍यात लाकडांचा अस्ताव्यस्त ढीग. भयाण शांतता. पडझड झालेल्या भिंती. भुतासारखी, वटलेली काही झाडे. कोपऱ्यात गंजलेल्या, भोकं पडलेल्या काळपट पत्र्यांचे लहान शेड. पहिल्यांदाच दिनू स्मशानात आलेला. इतक्या आतवर.  

कित्येक वर्षापासून इथं प्रेतं जळत आलेली. गावचे पुढारी, गावचे पाटील, गावचे माजी नगराध्यक्ष, बाया, शिक्षक, मास्तर, व्यापारी, अधिकारी. या जागेने किती जणांना पोटात घेतलय. ही सगळी मंडळी पुन्हा एकदा जीवंत झाली तर आणखी दोन गावं तयार होतील.

"या पलीकडच्या पत्र्यात तुझं सामान ठेव." अधिकाऱ्याच्या आवाजानं तो भानावर आला. अधिकारी दिनूला सूचना देत होता. त्याच्या झोपण्याची जागा..लाकडं किती घ्यायची.. पाणी कुठे आहे..अंतर कसं ठेवायचं.. रॉकेल किती वापरायचं.. प्रेत कसं जाळायचं..सगळ्या सूचना दिनूने ऐकल्या. 

अधिकारी निघून गेले. दिनूने सामान पत्र्यात ठेवले. नळा खाली जाऊन हात पाय धुतले. तिथेच एका दगडावर टेकला. 

एवढ्यात लांबून एक आकृती येताना दिसली. खांद्यावर फाटक्या तुटक्या घोंगड्याचा घोळ. हातात काठी. डोक्याला मुंडासं. पायात मोठे जाड पायताण. वाकून चालत चालत ती आकृती जवळ येत राहिली. दिनूच्या काळजात कालवाकालव झाली. धस्स झाले. या जळकटीकडे कोण येत असेल?  की भूत बित असेल. दिनूला जास्तच भीती वाटली. 

ती आकृती हळूवार चालत जवळ आली. दिनूकडे न पाहता तो इसम कोपऱ्यात गेला. घोंगड खाली टाकलं. त्यावर झोळी ठेवली. काठी बाजूला ठेवली. मग बंडी काढली. शांतपणे तो त्यावर बसला. 

मग धाडस करून  दिनू त्याच्या जवळ गेला.  जवळ उभा राहताच इसम स्वतःहून बोलला, 
"उमा म्हणत्यात मला. उमाजी माझं नाव. गेली पंधरा वर्षे मी इथे राहतो. पोरानं खून केला. त्याचा गुन्हा मी अंगावर घेतला. वीस वर्षे तुरुंगात काढली. बाहेर आलो. घरी गेलो. तर पोरांन घरी घेतलं नाही.  मग भिक्षा मागायला लागलो. घरापेक्षा सुरक्षित ठिकाण म्हणून इथं आलो. मग हेच माझं घर झालं".

ऐकून दिनू अवाकच झाला. पण मनात त्याला बरं वाटलं. तेवढीच सोबत झाली. 

आता दिवस मावळतीला गेला. थंडी पडू लागली. काळोख दाटू लागला. स्मशानातली उदासी वाढू लागली. 

उमाने गाठोडं सोडलं. भाकऱ्या, चपात्या, चवळीची उसळ, मागून आणलेलं बरंच त्यात होतं. ते बाहेर काढलं. दिनूला बोलवलं. दिनू संकोचला. पण भूक गप्प बसू देत नव्हती. 

दिनू आणि उमा दोघे जेवले. तिथेच झाडलोट केली. घोंगडी, पोती टाकली आणि आडवे झाले. तास-दोन तास गेले असतील. कोणाचा डोळा लागत नव्हता. दिनूचा तर पहिला दिवस. डोळे उघडे ठेवूनच पडला होता. तेवढ्यात लांबून गाडीचा उजेड दिसला.  स्मशानाच्या दिशेने येतेला. 

दिनू ऊठून बसला. गाडी इकडेच येत होती. बघता बघता गाडी स्मशानात घुसली. दोघे जण खाली उतरले. स्ट्रेचर बाहेर काढले. दिनूला बोलवले. स्ट्रेचरवर हिरवट प्लास्टिकमध्ये गुंडाळलेले प्रेत होते. ते कट्ट्यावर ठेवले. स्ट्रेचर गाडीत ठेऊन गाडी निघून गेली.

प्रेत कसं जाळायचं दिनूला माहीत नव्हतं. तो  लाकडे आणू लागला. तसा उमा उठला. तोही लाकडे आणू लागला. उमाच्या मार्गदर्शनात लाकडं रचली.  दोघांनी प्रेत उचललं.  लाकडावर ठेवलं. पुन्हा त्यावर लाकडे रचली. उमानं मूखाचा भाग तेवढे उघडा ठेवला. मग दिनूने रॉकेल टाकलं. लाकडं पेटवणार तोवर उमा म्हणाला, तोंड उघडून कोण आहे तर बघूया.. 

प्लास्टिक फाडलं आणि प्रेताचं तोंड पाहून दिनू उडालाच. हा तर हिंमत पाटील. जमीनदार. राजकारणातला बडा नेता. दोन मुले. एक मुलगी. ट्रॅक्टर. बुलेट. नारळाची बाग. मोठा परिवार. आपल्या हातून हिम्मत पाटलाला अग्नि? दिनूला कसंनुस वाटलं. पण मग इलाज नव्हता. दिनूने अग्नी दिला.

.....आणि दिनूची ड्युटी सुरू झाली.

रोज प्रेतं यायची. कधी पुरुष. कधी स्त्री. कधी गावातली प्रतिष्ठित व्यक्ती. कधी गरीब. कधी श्रीमंत. कधी दोन. कधी चार. 

एके दिवशी एकाच गाडीत कोंबलेली दोन प्रेतं आली. दिनूनं आणि उमानं ती चितेवर ठेवली. नेहमी सारखं तोंड उघडलं. तर भीमराव आणि राजाराम. बापरे..! दोघेही मोठे बागायतदार. चाळीस-चाळीस एकर जमीन. दोघांची पण पोरं डॉक्टर. पण सख्खे भाऊ पक्के वैरी. आयुष्यभर एकमेकांचं तोंड पाहिलं नाही. दोघांचे दोन पक्ष. दोघांची भांडणं बघून बा मेला. सुंदरा म्हातारी मेली. तरी दोघं एकत्र आली नाहीत. आज मात्र एकाच गाडीतून..आता जायदाद गेली. पोरं तरी काय कामाची? आता कुठला निवद. कुठली माती. कुठला कावळा. कुठलं गोड. सगळं संपलं.

दिनूचा असा रोजचा दिनक्रम चालू होता. उमा दिवसभर भीक मागायचा. रात्री आला की दोघं मिळून जेवायची. नंतर दिवसभर साचलेली मढी पेटवायची. कोरोनामुळे सगळं जग ठप्प. कुणाची कुणाला गाठ भेट नव्हती. शेजारच्या घरात काय चाललंय कळत नव्हतं. मग स्मशानात काय चाललंय कसं कळणार? दिनूची आणि उमाची स्मशानातली ही दुनिया..गावाला तर त्याचा पत्ताच नव्हता.

एके दिवशी दिनूला ताप आला. खोकल्याला पण सुरुवात झाली. थोडं चाललं तरी धाप लागायची. मग दिनू दिवसभर उमाच्या घोंगड्यावर पडून राहिला. त्यादिवशी उमा भिक्षा मागायला गेला नाही. दिनूला जेवण.. हवं नको.. करीत बसला. पाय दुखत होते म्हणून पाय चेपून दिले. चार वाजता चहा दिला. दिवसभर आलेली प्रेतं उमानच जाळली. 

संध्याकाळी उमाने दिनूला हॉस्पिटलला नेले. दोन-तीन दिवस तेथेच ठेवले. मग 14 दिवस काॅरंटाईन करायचे ठरले. कारण दिनू पॉझिटिव्ह आला होता. त्याची सारी उसाबर उमाने केली. चौदा दिवस स्मशान उमानेच सांभाळले. पिकून पांढरी विस्कटलेली दाढी, पिंजारलेले केस, जागरणाने तांबारलेले डोळे, जाडजूड चप्पल अशा अवतारात उमा दिवसभर राबत होता.

आठवडा गेला तरी दिनूचा  ताप कमी आला नाही. धाप तर वाढतच गेली. उमाने दिनूला दोन वेळा दवाखान्यात नेले. पण डॉक्टर म्हणे, बरा होईल. त्याला घरीच न्या. आणि अशाच एका मध्यरात्री दिनू शांत झाला. दिनू मरण पावला हे उमाला सहन होत नव्हतं..

सबंध गावची मढी जाळली. पण दिनूच्या प्रेताला हात लावताना उमा थरथरला. हात कापायला लागले. डोळे लालभडक होऊन पाणी पाझरायला लागले.

दिनू गेला. उमा एकटाच राहिला. स्मशानाची  भयाणता अधिकच गडद झाली. येणारी काळोखी रात्र जास्तच काळी झाली. पेटलेल्या चितेच्या उजेडात तांबूस झालेला उमा विमनस्क बसायचा. उमा तुरुंगात होता तेव्हा आणि बाहेर आल्यावर जवळचे नातेवाईक गेले पण उमा कधी रडला नव्हता. आता मात्र त्याला दिनूच्या आठवणीचे कढ येत राहायचे. रात्रभर पेटलेल्या चितेकडं बघत उमा अश्रू ढाळायचा. 

दिवस असेच जात राहिले. महिन्या चार महिन्यांनी दिनूचा पोरगा गावी आला. बाप गेला म्हणून नव्हे. जमीनजुमल्याकरिता. दिनूने बांधलेले घर. घेतलेली जमीन. वारस म्हणून नावे लावावीत.. म्हणून पोरगा गावी आलेला. पण पोरगा चावडीत जातो आणि त्याचे डोळेच पांढरे होतात. सगळ्या उताऱ्यावर नावे उमाची असतात.

एके दिवशी दिनूचा मुलगा, सून आणि मुलगी माझे ऑफिसला आले. म्हणाले, "साहेब, आमच्या बापाने बेकायदेशीर मृत्युपत्र केले आहे. त्यावर आमच्या सह्या पण नाहीत. त्याला आमची संमती पण नाही. ते मृत्युपत्र आम्हास रद्द करायचे आहे. काय करावे लागेल? 

मी म्हणालो, " दिनूने केलेले मृत्युपत्र योग्य आहे. कायदेशीर आहे. कारण ते मीच करून दिलेले आहे. शिवाय दिनूच्या इच्छेनुसार केलेले आहे. दिनूच्या मृत्युनंतर उमाने सगळी इस्टेट वृद्धाश्रमाला दिलेली आहे. आता केवळ उमाचे पोकळ नाव राहिलेले आहे. दिनूने इस्टेट मिळवली. त्यानेच विल्हेवाट लावली. नाहीतरी तुम्ही कुठे तुमच्या बापाला सांभाळले? त्यामुळे हा विषय येथेच संपवा अशी माझी विनंती राहील. तीच तुमच्या वडिलांना श्रद्धांजली ठरेल. त्यांनी आयुष्य तुमच्या साठी खर्च केलं. पण तुम्हाला ते घेता आलं नाही. केवळ घरात जन्मलो म्हणून आपण वारस होत नाही. खरा वारस म्हणून आईबापांची मनापासून सेवा करावी लागते. बाप राबत होता, त्यावेळी तुम्ही आपल्या घरात सुखात लोळत होता. पण तरीही त्याने तुमच्याबद्दल कधी राग केला नाही. त्याची जिंदगी तो शांतपणे जगला. बायको गेली. एकाकीपण वाट्याला आलं. आयुष्य काळोखं झालं. म्हातारपण पोरकं झालं. पोटाची आबाळ झाली. पण हे सारं दिनूनं मुक्या जनावरासारखं सोसलं. बायको गेल्यानंतर तो जे काही जगला ते उमामुळे. उमा..!  कोणाचा कोण तो? रस्त्यावरचा भिकारी. पण त्यानं दिनूला जगायला शिकवलं. दिनू तेवढच खरं आयुष्य जगला. आनंदानं त्यानं उमाच्या मांडीवर जीव सोडला.
म्हणून म्हटलं तुम्ही हा विषय सोडून द्या. याउपरही तुम्ही मृत्युपत्र रद्द करायचे ठरवले असेल तर मी हे काम करू शकणार नाही. तुम्ही दुसऱ्या कोणत्याही वकील साहेबांच्या कडे जाऊ शकता..

पाच-दहा मिनिटे अशीच गेली असतील. दिनूचा मुलगा, सून आणि मुलगी खाली मान घालून उठले. आणि ऑफिसच्या बाहेर चालू लागले...!!!!

ॲड. कृष्णा पाटील.
"राष्ट्राधार" तासगाव.
जि. सांगली.
Mob. 9372241368