खरी महालक्ष्मी
खऱ्या महालक्ष्मीकडे पाऊले
आजच्या स्त्री ची वळली नाही
विद्येची देवता सावित्री
अजून तिला कळली नाही
घरात तिच्या सजले आहे
काल्पनिक देवीचे ठाण
अन सावित्रीच्या उपकाराची
तिला मुळीच नाही जाण
अंधश्रद्धेने ग्रासलेल्या विचाराची
श्रद्धा अजून कशी ढळली नाही
अन विद्येची देवता सावित्री
अजून तिला कळली नाही
जिजाऊंच्या संस्काराची
तिला कळलीच नाही व्यथा
पिढ्यानपिढ्या रुजत गेल्या
काल्पनिक देवीच्या कथा
सुशिक्षित असो की अडाणी
रमाई,जिजाई,सावित्रीवर
श्रद्धा तिची भाळली नाही
अन विद्येची देवता सावित्री
अजून तिला कळली नाही
लोकमाता अहिल्याबाई
आणि त्यागमूर्ती रमाई
चुकून सुद्धा गायली नाही तिने
खऱ्या लक्ष्मीवर अंगाई
स्त्री जातीला कमी लेखणारी
मनुस्मृती तिने अजूनही
जाळली नाही
अन खरी विद्येची देवता सावित्री
अजून तिला कळली नाही
अजून तिला कळली नाही
कवी
रविंद्र सोनाळे गायतोंडकर
स्त्रियांमध्ये खऱ्या अर्थाने आत्मसन्मान जागृत करून त्या त्या काळात स्त्रीयांनाच नव्हे तर राज्यकर्त्याला आणि समाजाला मार्गदर्शन करणाऱ्या या आधुनिक गणराज्याच्या महागणनायिका म्हणजेच खऱ्या महालक्ष्मी अर्थात नवरात्रात पुजाव्या इतक्या महान या "महान नऊ अर्थाात महालक्ष्मी"
खऱ्या अर्थाने नऊ दुर्गा.......
१ ) राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब
२ ) छत्रपती शिवाजी महाराजांना युद्धधोरणामध्ये मदत करणाऱ्या त्यांच्या सहचारिणी आणि छत्रपती संभाजी महाराजांसारख्या प्रकांड पंडित आणि योध्याला जन्मदेणाऱ्या महाराणी सईबाईसाहेब
३ ) छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर स्वतः रण -मैदानात उतरून मुघलांशी युद्ध करणाऱ्या आणि औरंगजेबाला शिकस्त देणाऱ्या महाराणी ताराबाई.....
४ ) राजमाता अहिल्याबाई होळकर - मल्हारराव होळकरांच्या मृत्यूनंंतर २७ वर्षे राज्यकारभार करणाऱ्या महाराणी.....
५ ) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले - आमच्या अख्ख्या पिढ्या ज्यांनी दिलेल्या शिक्षणावर उभ्या आहेत त्या राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले .
६ ) मुक्ता साळवे - या देशातील जातीयतेबद्दल इंग्लडच्या राणीला पत्र पाठवून देशातील स्पृश्या-स्पृश्य आणि वर्णव्यवस्थेचे वास्तव मांडणारी मुक्ता साळवे .
७ ) फातिमा शेख - मुस्लिम समाजातील नियमांना फाटा देऊन शिक्षण घेणारी आणि व्यवस्थेविरुद्ध विद्रोह करणारी . सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंची खरी शिष्या....
८ ) रमाबाई आंबेडकर - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी ठामपणे उभी राहणारी . डॉ . बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणासाठी कष्ट उपसणारी पत्नी-सहचारिणी.....
९ ) ताराबाई शिंदे - ज्या काळात स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोण हा बरोबरीचा समजला जात नव्हता तेव्हा १८८२ ला " स्त्री-पुरुष तुलना " सारखा महान ग्रंथ लिहून स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फोडणारी . अन्यायाविरुद्ध लढणारी एक अभ्यासू .....
या सर्व महानायिकांना आजच्या खऱ्या महालक्ष्मीना विनम्र अभिवादन! विनम्र अभिवादन!! विनम्र अभिवादन!!!
संकलन - श्री. लोखंडे एच. आर.