सेवापुस्तिका (सर्व्हिस बुक)
१.भाग १ -
शासकीय कर्मचा-याची मूळ सेवा पुस्तिका म्हणजे "त्याचा आत्माच.!" त्यामुळे अगदी सेवानिवृत्त होईपर्यंत व त्यानंतर ही हा अतिशय महत्वाचा दस्तावेज शेवटपर्यंत जपून ठेवणे आवश्यक आहे.सेवापुस्तिका अद्यावत करणे व जपुन ठेवणे ही जबाबदारी कर्मचाऱ्याच्या वरिष्ठ कार्यलायाची म्हणजे प्रा.शिक्षक असेल तर पंचायत समितीची व
माध्यमिक शिक्षक असेल तर प्रशालेची असते
परंतु कार्यालयाकडून सेवापुस्तिका अद्ययावत व परिपूर्ण केल्या जात नाही.हे जरी सत्य असले तरी स्वता: कर्मचा-याने याबाबत दक्ष राहुन सेवा पुस्तिकेकडे लक्ष देणे आवश्यक आहे.याबाबतचा त्रास मग जेव्हा सेवानिवृत्ती जवळ येते त्यावेळेस जाणवतो. त्यावेळेस मग महत्वाच्या नोंदी करायच्या असतील तर ते रेकार्ड सापडत नाही.प्रशालेच्या स्तरावर मात्र सेवापुस्तिका ब-यापैकी अद्ययावत असतात कारण तेथे शिक्षकसंख्या मर्यादित असते व स्वतंत्र लिपिक असल्यामुळे अडचण नसते.
दुसरे महत्वाचे म्हणजे कर्मचा-याला पाहिजे तेंव्हा सेवापुस्तिका पाहता येते व वेळोवेळी आवश्यक त्या नोंदी करण्याविषयी सांगुन सेवापुस्तिका अद्ययावत करुन घेता येते. तरी पण जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा कर्मचा-याने सेवापुस्तिका हातात आल्यावर नोंदी अद्ययावत केल्या कि नाही याविषयी खात्री करणे.
एवढे जरी आपण केल तरीे भविष्यात होणारा त्रास आजच आपण टाळु शकतो.
२. सेवानिवृत्ती वेतन -
" जे जे आपणासी ठावे...."
मागच्या मे महिन्यात एका महिला कर्मचाऱ्याच्या निवृत्तीला अवघे ४/५ महिने बाकी असतांना आकस्मिक निधन झाले. मागे फक्त त्यांचे सेवानिवृत्त पती. निधन झालेल्या मॅडमच्या एका मैत्रिणीने family pension च्या कार्यवाहीसाठी प्रयत्न सुरु केले. मूळ सेवा पुस्तिका (सर्व्हिस बुक) हातात पडल्यावर आणि त्याची तपासणी केली असता तब्बल ३० ते ३५ नोंदी अपुर्ण असल्याचे निदर्शनास आले.त्यापैकी काही नोंदी दुसऱ्या जिल्ह्यातल्या विविध ठिकाणच्या.या सर्व नोंदी पुर्ण झाल्याशिवाय त्यांच्या आजारी पतीला family pension मिळणे अशक्य आहे.आता यक्षप्रश्न असा की, या अपुर्ण नोंदी पुर्ण करायच्या कशा ? त्यासाठी कागदपत्र मिळवायचे कुठुन ? दुस-या जिल्ह्यात जावून संबंधित अधिका-याच्या सह्या घ्यायच्या कशा ? प्रसंग सांगायचे तात्पर्य जर या सगळ्या नोंदी वेळीच संबंधित कार्यालयाने पूर्ण केल्या असत्या तर त्या मयत कर्मचाऱ्याच्या कुटुंबावर आज नोंदी पुर्ण करण्यासाठी व family pension साठी कार्यालयात हेलपाटे मारण्याची वेळ आली नसती. शिक्षकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे व कार्यालयात असणारी लिपीक मंडळीची मानसिकता यामुळे सेवा पुस्तिका अपुर्ण राहतात.आणि मग अशी काही एखादी अप्रिय घटना घडली तर कुटुंबाला आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो.
सेवा पुस्तिका पुर्ण करण्याची सर्वस्वी जबाबदारी प्रा.शिक्षकांच्या बाबतीत पंचायत समिती आणि माध्य.शिक्षकांच्या बाबतील प्रशाला कार्यालयाची असते पण आपलंही कर्तव्य आहे कधी तरी त्याविषयी चौकशी व खात्री करणे. वेळ निघून गेल्यावर काहीच करता येत नाही आणि कोणाविरुद्ध तक्रारही करता येत नाही.
म्हणून आपल्या सेवा पुस्तिकेविषयी सजग राहिले पाहिजे असं मला वाटतं.कारण कोण दिवस येई कसा कोण जाणतो....?
* भाग दुसरा -
सेवा पुस्तिकेत मोठ्या प्रमाणावर आढळणा-या काही त्रुटी -
१.सर्व सामान्यपणे मोठ्या प्रमाणावर आढळणारी एक त्रुटी म्हणजे गटविमा नोंदी.
गटविम्याच्या नोंदीमध्ये खालील प्रकारच्या त्रुटी आढळून येतात -
अ. गटविमा नोंद करतांना ज्या वेतन बिलात गटविमा वर्गणी कपात झाली त्या व्हाउचर नंबरची नोंद नसणे.
ब.गटविमा नोंदीत खाडाखोड असणे.
क. शासन नियमाप्रमाणे वेळोवेळी गटविमा वर्गणीत झालेल्या बदलानुसार सुधारित नोंदी नसणे.
ड. एखाद्या कर्मचा-याची पदोन्नती झाली असेल तर वेतनश्रेणीच्या अनुषंगाने गटविमा वर्गणी कपात नसणे
इ.सुधारित वर्गणी कपात उशिरा सुरु करण्यात आली असेल तर त्या वर्गणीच्या फरकाची नोंद नसणे.
ई.गटविमा नोंदीवर गटशिक्षणाधिकारी/
मुख्याधिकारी यांची स्वाक्षरी नसणे.
अशा सर्वसामान्यपणे त्रुटी आढळून येतात.यामुळे सेवानिवृत्तीनंतर गटविमा रक्कम परतावा परत घेतांना वर्गणी कपात होउनही योग्य ती नोंद नसेल तर वर्गणीची रक्कम व्याजासह भरावी लागते.त्याशिवाय आपल्याला आपली जमा असलेली गटविमा परताव्याची रक्कम जिल्हा परिषद देत नाही.त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आपल्या गटविम्याच्या नोंदी अद्ययावत आहे की नाही याची खात्री केलेली बरी.
* भाग तिसरा -
सेवा पुस्तिकेत मोठ्या प्रमाणावर आढळणारी त्रुटी म्हणजे कार्यमुक्ती व उपस्थिती बाबत नोंदी.
कर्मचा-याची बदली झाल्यानंतर त्याबाबतची कार्यमुक्ती व उपस्थिती ची नोंद आदेश क्रमांकासह व दिनांकासह सेवापुस्तिकेत असणे आवश्यक आहे. सामान्यपणे आढळणाऱ्या त्रुटी -
१. कार्यमुक्ती व उपस्थितीची नोंद सेवापुस्तिकेत नसणे.
२. सविस्तर आदेशासह व दिनांकासह नोंद न घेता संक्षिप्तपणे नोंद असणे.
३. नोंद घेतलेली असते पण त्यावर गटशिक्षणाधिकारी यांची स्वाक्षरी नसणे.
४. कधी कधी कार्यमुक्तीची नोंद असते पण उपस्थितीची नोंद नसणे.
अशा सर्वसामान्यपणे त्रुटी आढळून येतात.
यामुळे बदली झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सर्व नोंदी जर नसेल तर सेवानिवृत्ती वेतन प्रस्ताव मंजुर करतांना त्रुटी दर्शवून प्रस्ताव परत केला जातो. त्यामुळे कर्मचा-याने आपल्या बदलीच्या सर्व नोंदी अद्ययावत आहे की नाही याचीही खात्री केलेली बरी.
* भाग चौथा -
सेवा पुस्तिकेत अजुन एक सामान्यपणे मोठ्या प्रमाणावर आढळणारी त्रुटी म्हणजे
वारसाबाबत नामनिर्देशन.आजच्या बेभरवशाच्या काळात माणसाचे कधी काय होईल याचा नेम नाही त्यामुळे दुर्दैवाने जर कर्मचा-याच्या बाबतीत काही बरी वाईट घटना घडली तर सेवापुस्तिकेत वारसा बाबतच्या नामनिर्देशनाची नोंद योग्य प्रकारे नसेल तर पुढील मिळणा-या आर्थिक लाभासाठी व इतर कामासाठी कुटुंबियाना कोर्ट कचेरीत खेट्या माराव्या लागतात त्यासाठी सेवापुस्तिकेत नामनिर्देशनाची योग्य नोंद असणे आवश्यक आहे.आपण जर आजच्या तारखेत नामनिर्देशन केले असेल तर ते आवश्यकता वाटल्यास ६ महिन्यानंतर ते बदलू शकतो. त्यासंबंधी सामान्यपणे आढळणा-या त्रुटी -
१. नामनिर्देशानाची नोंद सेवापुस्तिकेत नसणे.
२. चार प्रकारच्या नामनिर्देशन नोंदी पुर्ण नसणे.
३. नोंद घेतलेली असते पण त्यावर गशिअ मुअची स्वाक्षरी नसणे.
४.सुरुवातीला केलेल्या नामनिर्देशनात कालांतराने वारसाच्या नावात बदल अथवा वारसात बदल झाला असेल तर त्याबाबत नोंद अद्यावयत नसणे.
अशा सर्वसामान्यपणे त्रुटी आढळून येतात.
यामुळे एखादा कर्मचारी दुर्दैवाने सेवेत कार्यरत असतांना मयत झाला तर कुटुंबियासमोर अनेक अडचणी येतात.त्यामुळे कर्मचा-याने आपल्या नामनिर्देशनाबाबतच्या सर्व नोंदी अद्यावयत आहे की नाही याचीही खात्री केलेली बरी.
* भाग पाचवा -
पुढे कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दोन महत्वाच्या गोष्टी होणार आहेत -
अ. सातवा वेतन आयोग -
सातवा वेतन आयोग लागु होणार असल्यामुळे जर मुळवेतनाबाबतच्या काही त्रुटी असतील तर सातव्या आयोगाप्रमाणे होणारी वेतननिश्चती चुकीची होईल.त्यामुळे एकतर वेतन जास्त मिळेल किंवा कमी.
आगामी वेतन आयोगात होणा-या सगळ्या बाबी अचूक होण्यासाठी वेतनाबाबतच्या त्रुटी काळजीपुर्वक वरिष्ठ कार्यालयाकडुन पुर्ण करुन घेणे आवश्यक आहे.त्यासाठी महत्वाचे म्हणजे
जि.प.च्या वित्त विभागाकडुन सेवापुस्तिकेची आजपर्यंत मिळालेल्या सर्व वेतन आयोगाची व इतर वेतन निश्चितीची वेतन पडताळणी होणे गरजेचे आहे.वेतनात काही तफावत असेल तर वेतनपडताळणीत ते समोर येईल पर्यायाने त्याची दुरुस्ती करणे सॊपे होईल.वरील सर्व बाबींची पडताळणी झालेली असेल आणि पडताळणीत जि.प.लेखाधिका-यांनी काही आक्षेप नोंदवले असेल तर त्या सर्व आक्षेपांची पुर्तता करणे आवश्यकच.
ब. सर्व्हिस बुक online -
दुसरी महत्वाची बाब म्हणजे येणा-या काही महिन्यात सेवापुस्तिका online होणार आहे.
त्यामुळे सेवापुस्तिकेत जर काही त्रुटी असतील तर त्या तशाच online upload होतील.
परीणामी कर्मचा-याला भविष्यात अडचणी निर्माण होवू शकतात.यासाठी सेवापुस्तिकेत काही त्रुटी असतील त्या वेळीच दुरुस्त होणे गरजेचे आहे.
* भाग सहावा "बदली विशेष" -
बदली झाल्यानंतर सेवापुस्तिका नविन कार्यालयात जमा करण्यापुर्वी अत्यंत महत्वाचे -
१. मूळ सेवा पुस्तिकेत कार्यमुक्तिबाबत सविस्तर नोंद व मा.गशिअ यांची स्वाक्षरी असल्याबाबत खात्री करणे.
२. यापूर्वी केलेल्या नोंदींवर मा.गशिअ यांची स्वाक्षरी असल्याबाबत खात्री करणे.
उदा. गटविमा नोंद
नामनिर्देशन नोंद
रजा मंजुरि नोंद
प्रशिक्षण नोंद
जादा अदाई वसुलि.
स्थायित्वाबाबत नोंद
मराठी/हिंदी परीक्षा सुट.
३. कार्यमुक्तिच्या तारखेपर्यंत रजेचा हिशोब पुर्ण असल्याबाबत खात्री करा .
४.कार्यमुक्तिच्या तारखे पर्यंत सेवा पडताळणी बाबत नोंद असल्याची खात्री करा.
५.ज्या शाळेवर उपस्थित झाले त्याबाबत आदेश क्रमांकासहित सविस्तर उपस्थितीबाबत नोंद मूळ सेवापुस्तिकेत करवून घ्या.
६. L.P.C. वर स्वता:चा शालार्थ ID असल्याबाबत खात्री करा.
७.अत्यंत महत्वाचे -
माहे फेब्रु.२०१८ च्या वेतनातून वै.अपघात विमा वर्गणी कपात झाली असेल तर सेवा पुस्तिकेत प्रमाणक क्रमांक टाकुन त्याबाबत नोंद घेणे.
८.मागील एक दोन वर्षाच्या काळात काही जादा अदाई/ रिकव्हरी अदा केली असेल तर त्याबाबत नोंद केल्याची खात्री करा. रिकव्हरीचे विवरणपत्र जपुन ठेवा.
उदा. MSCIT रिकव्हरी
5.5.10 नुसार रिकव्हरी
गटविमा फरक.इ.
* भाग सातवा -
चट्टोपाध्याय आयोगानुसार शिक्षकांना दिल्या जाणा-या वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतनश्रेणी या दोन्ही श्रेण्याबाबत ब-याचदा गोंधळ उडतो वरिष्ठ कोणती न निवड कोणती आणि कोण त्यासाठी पात्र ? साधारणपणे एकाच वेतनश्रेणीत १२ वर्ष वेतन घेतले कि त्यापुढची वरिष्ठ श्रेणी मिळते. आणि वरिष्ठ वेतन श्रेणीत १२ वर्ष वेतन घेतले की त्या पुढची मग निवडश्रेणी मिळते .पण यासाठी शासनाने विहित केलेल्या अटी पुर्ण केल्यानंतरच. मागच्या वर्षी शासनाने काढलेल्या २३ ऑक्टो.२०१७ मधील चट्टोपाध्यायच्या सुधारीत GR मधील नियम व अटी बघितल्या तर यापुढे कोणाला वरिष्ठ किंवा निवडश्रेणी मिळेल असे वाटत नाही. विशेष करुन संभ्रम पडतो तो निवडश्रेणी बाबत.
उदा. जर एखाद्या प्रा.शिक्षकाने १२ वर्षानंतरची वरिष्ठ श्रेणी ग्रेडपे ४२०० घेतली तर याच ग्रेडपे मध्ये १२ वर्ष वेतन घेतल्यानंतर पुढची निवडश्रेणी म्हणजे ग्रेडपे ४३०० मिळेल अर्थातच विहित नियम व अटी पुर्ण केल्यातरच. परंतू एखाद्या प्रा.शिक्षकाने वरिष्ठ श्रेणी ग्रेडपे ४२०० घेतल्यानंतर त्याने प्रा.पदवीधर वेतनश्रेणी ,मुअ किंवा माध्यमिक शिक्षकाची वेतनश्रेणी ग्रेडपे ४३०० स्विकारली तर त्या शिक्षकाला या पुढची कोणतीच चट्टोपाध्यय श्रेणी मिळत नाही.याचे कारण असे की, ग्रेडपे ४२०० ही प्रा.शिक्षकाची चट्टोपाध्ययची वरिष्ठ श्रेणी आहे .आणि यापुढची निवडश्रेणी ग्रेडपे ४३०० आहे. वारंवार ब-याच जनांकडुन असा प्रश्न विचारल्या जातो की, मी चट्टोपाध्याय वरिष्ठ श्रेणी ४२०० घेतल्यानंतर पुढे प्रा.पदवीधर किंवा मुअ किंवा माध्यमिक शिक्षकाची वेतनश्रेणी ग्रेडपे ४३०० घेवून मला १२ वर्षे याच वेतनश्रेणीत झाली. मग आता मला ४४०० ग्रेड पे मिळेल का ? तर वरील प्रश्नाचे उत्तर राहिल नाही. अशा शिक्षकाला ४४०० ग्रेड पे मिळणार नाही. याचे महत्वाचे कारण म्हणजे एका कर्मचाऱ्याला दोनदा चट्टो.वरिष्ठश्रेणी देता येत नाही. प्रा.शिक्षकाची वरिष्ठश्रेणी ग्रेड पे ४२०० आहे आणि प्रा.पदवीधर ,मुअ व माध्यमिक शिक्षकाची वरिष्ठ श्रेणी ग्रेड पे ४४००
असल्यामुळे वरील प्रश्न असलेल्या शिक्षकांना ग्रेड पे ४३०० मध्ये १२ वर्ष जरी झाले तरी प्रचलित नियमानुसार तरी कोणतीही पुढची वेतनश्रेणी मिळणार नाही.
* प्राथमिक शिक्षक -
मुळवेतन श्रेणी ग्रेड पे -२८००
वरिष्ठश्रेणी.ग्रेडपे ४२००
निवडश्रेणी ग्रेडपे ४३००
* प्रा.प.शि./ मुअ/माध्य.शिक्षक -
मुळवेतन श्रेणी ग्रेड पे -४३००
वरिष्ठश्रेणी.ग्रेडपे ४४००
निवडश्रेणी ग्रेडपे ४८००
* भाग आठवा - (वैद्यकिय प्रतिपुर्ती)
(मेडिकल फाईल)
कर्मचा-याच्या जिव्हाळ्याचा अजुन एक महत्वाचा विषय म्हणजे वैद्यकिय प्रतिपुर्ती प्रस्ताव कारण प्रत्येकाला कधी न कधी दवाखान्यातील भरमसाठ खर्चाचा आकस्मिक सामना करावा लागतोच.याविषयी पूर्ण माहिती नसल्यामुळे व प्रस्ताव तयार करतांना त्यामध्ये त्रुटी राहिल्यामुळे कर्मचारी बरेचदा या शासनाच्या योजनेपासून वंचित राहतो.त्यामुळे आज या योजनेबद्दल थोडेसे महत्वाचे.
* शासन निर्णय सा.आरोग्य विभाग दि.१९/३/२००५ च्या सहपत्रानुसार शासनाने या योजनेसाठी २७ आकस्मिक आजार व ५ गंभीर आजाराची यादी घोषित केलेली आहे. वरील यादीतील आजारासाठी कर्मचा-याने आपल्या कुटूंबातील एखाद्या सदस्याला दवाखान्यात दाखल करुन खर्च केला असेल तर आजाराच्या स्वरुपानुसार ९० ते १०० टक्क्यापर्यंत खर्च कर्मचा-याला वैद्यकिय प्रतिपूर्तीच्या रुपाने परत मिळु शकतो. यासाठी खालिल गोष्टी महत्वाच्या -
१.वरील यादीतील २७ किंवा ५ या पैकीच आजार असावा.
२. रुग्णाला दवाखान्यातून डिस्चार्ज झाल्यापासुन १ वर्षाच्या आत वैद्यकिय प्र.प्रस्ताव जि.प.ला अथवा कर्मचा-याच्या वरिष्ठ कार्यालयाला दाखल करणे आवश्यक.
३. आरोग्य विमा कार्यालयाकडुन अथवा धर्मदाय संस्थेकडुन या बाबतचा खर्च दवाखान्याला अदा करण्यात आला असेल तर प्रस्ताव दाखल करता येत नाही.
४.विहित नमुन्यातील साधारणपणे ३०/४० पेजेसचा हा प्रस्ताव पुर्ण करुन डिस्चार्ज झाल्यापासुन एक वर्षाच्या आत दाखल करणे आवश्यक.
५. रु.१०००००/
(एक लाख) पर्यंतचे वै.प्र. प्रस्ताव मंजुरीचे अधिकार मा.E.O.यांना अाहे.
६. रु.३०००००(तीन लाख) पर्यंतचे वै.प्र. प्रस्ताव मंजुरीचे अधिकार मा.C.E.O.यांना आहे.
७. रु.३०००००(तीन लाख) च्या पुढील वै.प्र. प्रस्ताव मंजुरीचे अधिकार मंत्रालय मुंबई यांना आहे.
८. प्रस्ताव तयार करतांना महत्वाचे म्हणजे प्रस्ताव त्रुटी विरहित असावा जेणेकरुन वारंवार परत येणार नाही.म्हणुन अनुभवी व जाणकार व्यक्तीच्या सल्ल्याने सदरील प्रस्ताव तयार करुन सादर करावा.हे सगळे करत असतांना व कागदपत्रांची जमवाजमव करतांना ,प्रस्ताव मंजुर होईपर्यंत बराच त्रास होतो.परंतु शासन cashless योजना लागु करेपर्यंत याला काहीच पर्याय नाही. आणि त्रासाशिवाय पैसा मिळत नाही हे पण सत्य.
* भाग नववा -
सेवानिव्रुत्ती वेतन(पेंशन) विशेष
सेवानिवृत्तीनंतर अनेक कर्मचारी पेंशनसाठी कार्यालयात आपल्याला खेट्या घालतांना दिसतात तरीही महिनो न महिने पेंशन मिळत नाही याचे कारण म्हणजे सेवापुस्तिकेतील त्रुटी व पेंशन प्रस्तावातील त्रुटी.
वेळेवर पेंशन मंजुरीसाठी खालील काही गोष्टीची काळजी घेतली तर कार्यालयात हेलपाटे मारण्याची वेळ येणार नाही.प्रस्तावात आढळुन येणा-या काही महत्वाच्या त्रुटी -
१.वयाबाबत क्षमापन -
एखादा कर्मचारी शासनाने विहित केलेल्या वयाच्या मर्यादेपेक्षा अधिक वयानंतर सेवेत प्रविष्ठ झाला असेल तर अधिकच्या वयाबाबत क्षमापन करुन घेणे व त्याबाबत नोंद घेणे आवश्यक असते.
उदा. खुल्या प्रवर्गासाठी वयाची मर्यादा २८ वर्ष असेल आणि २९ वर्षानंतर कर्मचारीसेवेत प्रविष्ठ झाला असेल तर १ वर्षाचे वयक्षमापन मा.मुकाअ मार्फत मा.विभागीय आयुक्तांकडुन करुन घ्यावे लागते.
अनुकंपा धर्तीवर एखादा कर्मचारी सेवेत आला असेल तर त्यासाठी वयक्षमापनची आवश्यकता नाही परंतु नियुक्ती आदेशात अनुकंपाबाबत उल्लेख असावा आणि सेवापुस्तिकेत तशी नोंद असावी.
२.तांत्रिक खंडाबाबत क्षमापन -
एखाद्या कर्मचा-याला सेवेत प्रविष्ठ झाल्यानंतर मधेच काही दिवसाचा खंड दिला असेल तर तेवढ्या दिवासाचा खंड क्षमापित करुन घ्यावा लागतो. खंडाच्या काळातील रजा मंजुर करुन तशी नोंद घेणे गरजेचे असते.
३.पदोन्नती बाबत विकल्प -
पदोन्नती घेतली असेल तर त्याबाबतचे विकल्प फार्म सेवापुस्तकेत दिसुन नाही.
खास करुन मुअ/केंप्र/ शिविअ इत्यादि.
विकल्प नसेल तर पुन्हा विकल्प फार्म भरुन सेवापुस्तिकेत जोडणे आवश्यक.
४.वेतन पडताळणी मधील आक्षेप
वेळोवेळी करण्यात आलेल्या वेतन पडताळणीत काही आक्षेप नोंदवले असेल तर त्याची पुर्तता करणे गरजेचे .
उदा. पुनर्वेतन निश्चिती करणे, जादा अदाई अदा करणे त्याबाबत आवश्यक त्या नोंदी करणे.व जादा अदाईबाबत विवरणपत्र दोन प्रती मधे सोबत जोडणे आवश्यक.
५. संगणक परीक्षा( MSCIT) सुट
वय वर्ष ५० पुर्ण झाले असेल आणि संगणक परीक्षा उत्तीर्ण नसेल तर त्याबाबत सुट घेवुन तशी नोंद घेणे गरजेचे.