विश्ववंदनीय तथागत गौतम बुद्ध माहिती
वयाच्या २९ व्या वर्षी घरदार सोडून सहा वर्षे अरण्यात तपस्या करणाऱ्या सिद्धार्थ गौतमाला जे बुध्दत्व प्राप्त झाले तो आजवरच्या विश्वाच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ शोध आहे.
जेव्हा सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग केला.तेंव्हा तत्कालीन समाजव्यवंस्थेमध्ये दोन विचारधारा प्रमुख होत्या_
१.एक म्हणजे 'खा, प्या, मजा करा' असा टोकाचा भोगवाद.
२.दुसरा प्रकार म्हणजे शरीराला आत्यंतिक त्रास होईल अशी तपस्या सांगणारा वैराग्य मार्ग.
"गौतम बुद्धांनी या दोन्ही मार्गांना त्यागून मध्यम मार्ग शोधला. ज्याला 'सम्यक संबोधी' असे म्हटले गेले."
सिद्धार्थ गौतमाला मानवी दु:खाचे मूळ कारण सापडले.त्या दुःखाच्या निवारणाचा मार्ग सापडला.ज्याला चार 'आर्यसत्य' असे म्हटले आहे.
१.पहिले सत्य म्हणजे
"जगात दु:ख आहे."
२.दुसरे सत्य
"त्या दु:खाला काहीतरी कारण आहे ."
३.तिसरे सत्य
"त्या कारणाचे निवारण करता येते."
४. आणि चौथे सत्य
"त्या दु:खाचे निवारण करण्याचा मार्ग आहे."
त्या दुःख निवारण करण्याच्या मार्गाला गौतम बुद्धांनी "आर्य अष्टांगिक मार्ग'" असे म्हटले आहे.
आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजे आठ अंग असलेला मार्ग होय,ज्याच्याप्रमाणे आचरण केले तर तुमचे दु:ख समूळ नष्ट होते.दु:ख आणि दु:खाचे निवारण यालाच गौतम बुद्धांनी प्राधान्यक्रम दिला.
गौतम बुद्धांनी निरर्थक गोष्टीवर कधीच भाष्य केले नाही.बुद्धांनी दु:खाची व्याख्या केली आणि या दु:खापासून मुक्त होण्यासाठी त्यांनी आर्य अष्टांगिक मार्ग दिला.
या मार्गाचे तीन भागात विभाजन
१. "पहिला भाग आहे 'शील'
२. "दुसरा 'समाधी' आणि
३. "तिसरा 'प्रज्ञा'.
१.शील म्हणजे नियम -
"समाजात कसे वागावे याचे नियम. समाजामध्ये अशी व्यवस्था निर्माण व्हावी.जिचा मूलाधार हा न्याय, समता,व्यक्तिस्वातंत्र्य, आणि समान संधी हा असेल.
शील पालनाचा आणि मनाचा खूप जवळचा संबंध आहे कारण मनावर ताबा असला तरच शील पाळता येते.
एखाद्या व्यसनाधीन माणसाला व्यसनाचे दुष्परिणाम चांगले ठाऊक असतात.व्यसनातून बाहेर पडावे असे त्याला वाटत असते.पण मनावर ताबा नसल्यामुळे तो परत-परत त्या चक्रात अडकत जातो.
२.मनावर संयम मिळविण्याकरिता गौतम बुद्धांनी समाधीचा पुरस्कार केला.अशी समाधी (मनाची एकाग्रता) शिकवली जिचा मूलाधार निसर्गनियम आहे.
श्वास आणि संवेदनेवर आधारित साधना शिकवली.
जी साधना कोणताही माणूस सहज करू शकतो त्याला कसलाही अडथळा येत नाही.
आपला नैसर्गिक श्वास तटस्थपणे,साक्षीभावाने अनुभवणे म्हणजेच "आनापान" आणि शरीरावर होणाऱ्या संवेदनां साक्षीभावाने अनुभवणे म्हणजे "विपश्यना." त्यातून मन एकाग्र होते आणि मनावर ताबा येतो.
३.शील आणि समाधीच्या अभ्यासातून "प्रज्ञा" विकसित होते. "प्रज्ञा म्हणजे ज्ञान" असे ज्ञान ज्यातून दु:खाच्या कारणाचा बोध होतो आणि दु:खाचे कारण दूर केले की दु:ख दूर होते.माझ्या दु:खाला मीच जबाबदार आहे.मीच ते निर्माण केले आहे. आणि मलाच ते दूर करावे लागेल.
याचा बोध त्याला होतो.आणि तो कार्यशील होतो.ज्या माणसाला हे तत्त्व समजले. ज्याने याचा अनुभव घेतला तो निरर्थक गोष्टीत रमत नाही. मी या मानव समाजाचा एक घटक आहे.आणि हा समाज सुखी असला तरच मी सुखी राहीन. ही भावना त्याच्यात वाढीस लागते.
मग आपोआपच मनाच्या विकारांची बंधने तुटू लागतात. वैरभाव दूर होऊ लागतो".
गौतम बुद्धांनी म्हटले आहे-
"न हि वेरेन वेरानि, सम्मन्तीध कुदाचनं। अवेरेन च
सम्मन्ति, एस धम्मो सनन्तनो "
म्हणजेच...
वैर वैराने शमत नाही ते अवैरानेच संपते. या अवैराच्या विचारातून सर्वांबद्दल प्रेम, मैत्री आणि सदभाव वाढू लागतो.यातूनच करुणेचा उदय होतो. ही मैत्री करुणाच सामाजिक स्वास्थ्य वाढविते.मैत्री आणि करुणा हा बुद्धविचाराचा स्थायीभाव आहे. ते मानवी मनाचे टॉनिक आहे. विशेष म्हणजे ते सर्वत्र लागू होणारे आहे.त्याला स्थळ-काळाचे बंधन नाही. त्यात काळानुरूप बदल करण्याची गरज नाही.
"पंचशील 2500 वर्षांपूर्वी आवश्यक होते,आजही ते तितकेच आवश्यक आहे, उद्याही ते तितकेच महत्त्वाचे राहणार आहे."
संकलन - श्री. लोखंडे एच. आर.